हैदराबादच्या एका पंचतारांकीत हॉटेलमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एक व्यक्ती येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये तब्बल 102 दिवस राहिला, पण 12.34 लाख रुपयांचं बिल हॉटेल प्रशासनाकडून मिळताच तो फरार झाला. हॉटेलला 12.34 लाख रुपयांचा गंडा घालणारी ही व्यक्ती विशाखापट्टणम येथील व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली आहे.

हैदराबादच्या प्रसिद्ध ताज बंजारा हॉटेलमध्ये ही घटना घडलीये. हॉटेल प्रशासनाने याबाबत शनिवारी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ए. शंकर नारायण नावाच्या एका व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बंजारा हिल्स पोलीस स्थानकात आरोपीविरोधात आयपीसी कलम 420 आणि 406 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली व्यक्ती विशाखापट्टणम येथील व्यवसायिक असल्याचं सांगितलं जात आहे. 4 एप्रिल रोजी नारायण हे हॉटेलमध्ये आले होते, अनेक दिवसांसाठी राहण्याचा कार्यक्रम असल्याचं सांगितल्यामुळे हॉटेल प्रशासनाने नारायण यांना अगदी सवलतीच्या दरात लग्जरी रुम दिली.

हॉटेल प्रशासनानुसार, आरोपी हॉटेलमध्ये 102 दिवस राहिला. एवढ्या दिवसांचं 25.96 लाख रुपये इतकं बिल झालं. वारंवार मागणी केल्यामुळे त्याने मध्यंतरी 13.62 लाख रुपयांचा भरणा केला होता, पण उर्वरित 12.34 लाख बिल न भरता तो अचानक कोणालाच काहीही सूचना न देता हॉटेल सोडून फरार झाला. यानंतर हॉटेल प्रशासनाने आरोपीशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद होता. त्यानंतर अखेर हॉटेलच्या व्यवस्थापकांनी पोलीस स्थानक गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

लोकसत्ता

Find out more: