शिवस्वराज्य यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. आज शिवस्वराज्य यात्रा अंबाजोगाईत पोहचले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षांतराच्या मुद्यावरून भाजपला चांगलेचं सुनावले आहे. पक्ष बदलाचा बाजार भाजपाने सुरु केला असल्याची अशी घणाघाती टीका यावेळी त्यांनी केली.
जयंत पाटील म्हणाले की, पक्ष बदलाचा बाजार भाजपाने सुरु केला आहे.वेगवेगळ्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचे प्रकार भाजपकडून सुरु आहे. पवारसाहेबांनी पळून गेलेल्या नेत्यांना सगळं काही दिलं होत. खुर्चीशिवाय त्यांना कुठेही बसवलं नाही, तरी ते लोक पक्ष सोडून गेले आहेत.तसेच माध्यमात येणाऱ्या गोष्टींपेक्षा जमीनीवरील परिस्थिती आज वेगळी आहे याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी दिली. पवारांसारखा जाणता राजा आहे, शिवाय तरुण बहाद्दरांची फळी आमच्याकडे आहे, त्यातून आम्ही नवा महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान विधानसभा निवडणुकी आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्के बसत आहेत. कारण अनेक निष्ठावान आणि अनुभवी नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम ठोकत सत्ताधारी भाजप-सेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात निवडणुकी आधीचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तर काही विधानसभा मतदारसंघांमध्ये नव्या उमेदवारांची चाचपणी करण्याची वेळ आली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel