मुंबई : प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचार्य यांच्या आदेशाने दोघींनी आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप महिला कोरिओग्राफरने केला आहे.
गणेश आचार्य यांच्यासह तिघांविरोधात अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 जानेवारीला अंधेरी पश्चिममधील ‘रहेजा क्लासिक’मध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. किरकोळ कारण आणि गैरसमजातून गणेश आचार्य यांच्या सांगण्यावरुन दोघी जणींनी आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केली, असा आरोप कुमारी दिव्या कोटीयन नावाच्या कोरिओग्राफरने केला आहे. जयश्री आणि प्रिती अशी दोन तरुणींची नावं आहेत.
मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून यावेळी गणेश आचार्यही उपस्थित असल्याचा दावा तक्रारदार तरुणीने केला आहे. त्यानुसार आचार्य यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपांविषयी गणेश आचार्य यांनी अद्यापही मौन पाळलं आहे.
गणेश आचार्य यांच्याविरोधात अभिनेत्री तनुश्री दत्तानेही तक्रार केली होती. अभिनेते नाना पाटेकर यांच्याविरोधात तनुश्रीने विनयभंगाचा आरोप केला होता, त्यावेळी सहआरोपींमध्ये गणेश आचार्य यांचाही समावेश होता. ज्येष्ठ नृत्यांगना सरोज खान यांच्यासोबतही गणेश आचार्य यांचे काही दिवसांपूर्वी खटके उडाले होते. आचार्य यांनी नवीन डान्सर असोसिएशन सुरु केल्यामुळे सरोज खान यांनी आक्षेप घेतला होता. गणेश आचार्य राजकारण करत असल्याचा दावा सरोज खान यांनी केला होता.
click and follow Indiaherald WhatsApp channel