लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या. तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पक्षाला 52 जागा मिळाल्या. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद प्राप्त करण्यासाठी सर्वात मोठ्या विरोधी पक्षाकडे 55 जागा असणे गरजेचे असते. काँग्रेस या संख्याबळापासून थोडीशी दूर आहे. सलग दुसर्यांदा काँग्रेसला लोकसभेतले विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता मावळली आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आतापर्यंत उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड, ओडिशा काँगे्रसचे अध्यक्ष निरंजन पटनाईक, झारखंड काँग्रेसचे अजय रॉय, आसाम काँग्रेसचे रिपून बोरा यांनी राजीनामा दिलेला आहे. राजीनामा सत्र सुरूच आहे.
ज्येष्ठ नेत्यांत कलगीतुरा
कर्नाटकातील काँग्रेसचे नेते रोशन बेग यांनी थेट पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर खळबळ उडाली होती. दुसरीकडे केरळ काँग्रेसचे नेते अब्दुल्ला कुट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली आहे. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या काँग्रेसशासित राज्यांच्या राजकारणात वादळ आले आहे. यातील मध्य प्रदेश आणि कर्नाटक ही राज्ये काठावरच्या बहुमतात आहेत. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यादरम्यान पराभवावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. पराभवाच्या धक्क्यातून राजस्थान काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजूनही पुरते सावरू शकलेले नाहीत.
मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंग यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसच्या ज्येष्ठांचे वाद यानिमित्त चव्हाट्यावर आले आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel