काँग्रेस पक्ष सध्या अडचणीत असून पक्षाला निलंगा विधानसभेची जागा जिंकायची असेल तर आपल्या उमेदवारीची मागणी पक्षश्रेष्ठी निश्चितच मान्य करेल असा विश्वास काँग्रेसचे इच्छुक उमेदवार पंडितराव धुमाळ यांनी व्यक्त केला. पंडितराव धुमाळ यांनी महाराष्ट्र देशाला मुलाखत दिली. त्यावेळी ते बोलत होते.

धुमाळ म्हणाले की, पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून विधानसभेची उमेदवारी दिली तर आपण पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून या मतदारसंघातून विजय संपादन करु.निवडून आल्यानंतर समाजाच्या विविध समस्या सोडवून सामान्य जनतेची प्रामाणिकपणे सेवा करून जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून आपण काम करत असताना सामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात कामे करून जसा आदर्श निर्माण केला होता तसाच आदर्श आमदार झाल्यानंतरही निर्माण करु.

आपल्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल का ? असा प्रश्न विचारला असता आपण मागील १०-१२ वर्षांपासून पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून पक्षाचे काम अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. सामाजिक कार्याची आपल्याला आवड असल्यामुळे सामाजिक कार्य ही आपल्या राजकारणाची मोठी जमेची बाजू आहे.काँग्रेस पक्षाला आज एक एक आमदार महत्त्वाचा असल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून निश्चितच आपल्या उमेदवारीचा विचार होईल असा आशावाद त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

पक्षाला लागलेल्या गळतीमुळे आज जरी काँग्रेस पक्ष अडचणीत आला असला तरी येणारा काळ हा आघाडी काँग्रेससाठी चांगला राहणार आहे. काँग्रेस पक्षाचे सध्या या माध्यमातून एक प्रकारे शुद्धीकरण होत आहे. आगामी निवडणुकीत अनेक नव्या चेह-यांना संधी मिळणार आहे. या नव्या चेहऱ्यांचा पक्षाला मोठा फायदा होणार असून या नव्या चेहऱ्यांच्या मागे मतदार मोठ्या प्रमाणात उभे राहणार आहेत.

आपण राजकीयदृष्ट्या अति महत्वकांक्षी आहात असे बोलले जाते याकडे लक्ष वेधले असता मागील २०१४ च्या निवडणूकीत अशोकराव पाटील यांच्या उमेदवारीचा क्लेम असल्यामुळे आपण त्यावेळी अनेकांचा आग्रह असतानाही आपण उमेदवारीची मागणी केली नव्हती. त्यामुळे आपण अतिमहत्त्वाकांक्षी आहोत हे म्हणणे चुकीचे आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: