इंदापूरला कालव्यामधून खडकवासला धरणातून पाणी सोडण्याबाबत शासनाला आम्ही धारेवर धरले. विधानभवनात धरणे आंदोलन केली. परंतु तालुक्‍यातील विरोधकांना वीस वर्षे मंत्रीपद असताना त्यांनी इंदापुरच्या पाण्याचा प्रश्‍न का सोडवला नाही.?, असा खडा सवाल आमदार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केला. दरम्यान, उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल, त्याप्रमाणे काम करू, असे सूचक वक्‍तव्य करून इंदापूर विधानसभेच्या उमेदवारीबाबत गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेच्या गुऱ्हाळावर भरणे यांनी मौन सोडले.

इंदापूर तालुक्‍यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी (दि. 27) येणार आहे. याबाबत इंदापूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष महरुद्र पाटील, प्रताप पाटील, प्रवीण माने, अभिजीत तांबिले, अमोल भिसे, डॉ. शशिकांत तरंगे, किसन जावळे, सर्व नगरसेवक उपस्थित होते.

आमदार भरणे म्हणाले की, खडकवासलासंदर्भांत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, प्रकल्पात तरतूद केली नाही. मग विरोधक मंत्री असताना 20 वर्षांत का मागणी केली नाही, तिकडे जानाई शिरसाई, दौंड, हवेली तालुक्‍यात पाणी सुरू आहे. आपल्यालाही रोटेशनने पाणी देण्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. इंदापूर तालुक्‍यातील आजही 27 गावांची पाण्याची गरज भागत नाही. एकूण 14 तलाव कोरडे आहेत. त्यामध्येही लवकर पाणी सोडण्याची आम्ही मागणी केली.संपूर्ण महाराष्ट्रात दुर्दैवाने दुष्काळ पडला. मात्र इंदापूर तालुक्‍यात केवळ आमदारामुळे दुष्काळ पडला, असे विरोधकांनी म्हणायचे बाकी राहिले आहे. असा टोला विरोधकांना भरणे यांनी हाणला.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: