ज्या कॉंग्रेस पक्षात आता आत्मा राहिलेला नाही, तो चिंतन कशाचे करणार. ज्यांनी पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारली त्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ते राज्यात पक्ष कसा उभा करणार? अशी खोचक टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव घेता केली.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात पक्षाची खऱ्या अर्थाने अधोगती सुरू झाली. आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यावर दोषारोप करण्याचा धंदा त्यांनी आता तरी बंद करावा, असा इशारा त्यांनी दिला.

संगमनेर येथे भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या निमित्ताने विखे पाटील संगमनेर येथे आले होते. या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात भाजप आणि शिवसेना यांची युती होईलच, असा ठाम विश्वास व्यक्त केला. मागील पाच वर्षांत राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दुष्काळमुक्त करण्याचं धोरण घेतलेलं आहे.

या धोरणाला निश्‍चितच पाठबळ मिळेल, असे स्पष्ट करुन मंत्री विखे पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सरकारची भूमिका जनतेपर्यंत आम्ही घेवून जाणार आहोत. संगमनेर तालुक्‍याचा विचार केला, तर जे स्वत:च्या तालुक्‍यात आता उभारी घेऊ शकत नाही, ते पक्षाला राज्यात कशी उभारी देणार.

त्यांच्या जवळच आता माणसे राहिनात, अशा शब्दांत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर ना. विखेंनी टीका केली. ज्येष्ठनेते शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या भावनिक आवाहनावर विचारलेल्या प्रश्‍नास उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, पवार यांना भावनिक आवाहन करण्याची वेळ का आली? हा प्रश्‍न त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विचारला पाहिजे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: