विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधीपक्षातील दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडून सत्ताधाऱ्यांचा झेंडा हाती घेतला होता. राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आलेले पांडुरंग बरोरा शिवसेनेत आल्यामुळे सेनेचे माजी आमदार दौलत दरोडा नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच दरोडा आता राष्ट्रवादीच्या गोटात सामील होण्याची चिन्हं आहेत.
दरोडा यांनी पक्षांतर केल्यास शहापूरच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शहापूरमध्ये शिवसेनेची ताकद बघून पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादीसोबत असलेले 40 वर्षांचे संबंध तोडून शिवसेनेत आले. पांडुरंग बरोरा एबी फॉर्म घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. परंतु 15 वर्ष शिवसेनेचं आमदारपद भूषवलेले माजी आमदार दौलत दरोडा आणि त्यांचे समर्थक यामुळे खंतावले आहेत.
पांडुरंग बरोरा यांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलेले दौलत दरोडा आता राष्ट्रवादीत जाणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. दरोडांप्रमाणे शिवसेनेत एकापेक्षा एक उमेदवार असताना पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेत का घेतलं गेलं, यामुळे शिवसैनिकांत प्रचंड प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे.
पांडुरंग बरोरा यांनी 10 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात शिवबंधन बांधलं होतं. शहापूर तालुका टंचाईमुक्त आणि विधानसभा भगवा युक्त करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन असे पांडुरंग बरोरा यांनी सांगितले होते.
click and follow Indiaherald WhatsApp channel