मुंबई – दोन वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना सरकारकडून राबविण्यात आलेल्या प्लॅस्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे वेळोवेळी आपल्या समोर आले आहे. पण आता राज्यात पुन्हा एकदा एकदा वापराच्या (सिंगल युज) प्लॅस्टिकवर बंदी घालण्यासाठी नवी डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. राज्यात सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर महाराष्ट्र दिनी एक मेपासून बंदी घालण्यात येणार आहे. हा निर्णय राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नागरिकांमध्ये महाराष्ट्र प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. प्रचार मोहिम त्यासाठी आखण्यात येईल. त्याचबरोबर या संदर्भातील राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हाधिकारी कार्यालयांकडूनही त्यांचा अहवाल मागवून घेण्यात येणार आहे. हा अहवाल राज्य सरकारकडे २० फेब्रुवारीपर्यंत द्यावा लागणार आहे.
राज्यातील स्वयंसेवी संस्था आणि शाळांचेही महाराष्ट्र प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य घेण्यात येईल. सामान्य नागरिकांचा या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी त्यामध्ये सहभाग असणे आवश्यक आहे. यात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, क्लब यांचा समावेश केल्यामुळे हे उद्दिष्ट यशस्वी होऊ शकेल, असे आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत सुचविल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
click and follow Indiaherald WhatsApp channel