मुंबई – वडाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक भारतीच्या अधिवेशनात बोलताना शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी राज्यात झालेल्या शिक्षणाच्या अवस्थेवर बोलत भाजपवर निशाणा साधला. ज्याला शिक्षणाचे ‘हो का ठो’ कळत नव्हते त्यांना पाच वर्ष शिक्षण मंत्री केल्यामुळे पाच वर्षात मागील सरकारने शिक्षणाचे काय केले हे सांगायचे तर एका शब्दात सांगायचे तर त्यांनी ‘शिक्षणाच्या आयचा घो’ केला, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत पुढे म्हणाले की, माझ्याकडे शिक्षक मागच्या सरकारच्या काळात त्यांचे प्रश्न घेऊन आले होते. मी तेव्हा बोलायचो थांबा, आपले सरकार येईल आणि आता आपले सरकार राज्यात आले आहे. 5 वर्षात या लोकांनी पुस्तकातील धडे बदलले, आपण सरकार बदलले आणि त्याना मोठा धडा दिला. 5 वर्षात विष पेरण्याचा यांनी प्रयत्न केला, जे परंपरेने लाभले. ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. शिक्षकांना राजकीय कार्यकर्ते आणि गुलाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता बदल झाला आहे, आपले सरकार आले आहे.
राज्याची आपल्याकडे कंत्राटी शिक्षक नेमण्याची ही परंपरा नव्हती. पण चुकीच्या धोरणामुळे ती आणली गेली. महाराष्ट्र घडवण्याचे काम शिक्षकांनी केले आहे, त्यामुळे मंत्रालयात शिक्षकांना ताठ मानेने जाता आले पाहिजे. सात शिक्षक प्रतिनिधींनी विधानपरिषदेत आहेत. एक दिवस त्यांनी विधान परिषद बंद पाडायला हवी. माझी बायको शिक्षिका आहे, त्यामुळे मला प्रश्न कळतात. ज्या गोरगरीब विद्यार्थ्यांना काम करून शिकायचे असते, त्यांच्या रात्रशाळा, महाविद्यालये पूर्वीच्या लोकांनी बंद केले. शिक्षकांचे खूप प्रश्न आहेत, त्यांच्या मागण्या खूप आहेत. मी कधी मंत्रालयात जात नाही, पण शिक्षकांच्या प्रश्नासाठी मी येईन, असे आश्वासन राऊत यांनी दिले.
click and follow Indiaherald WhatsApp channel