नागपूर : राज्यात कोरोना बाधितांची संख्या 49 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूंचा संसर्ग अजून वाढू नये त्या पार्श्वभूमीवर अनेक प्रयत्न केले जात आहे. राज्य सरकारकडून वारंवार हात धुवा, गर्दी टाळा असे आवाहन केलं जात आहे. नुकतंच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. “जे कोणीही राज्य सरकारच्या सूचनेचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,” असे अनिल देशमुख म्हणाले.
“राज्यातील सर्व दारुची दुकान, बार, हॉटेल्स, क्लबना सूचना दिल्या आहेत. सध्या मास्क आणि सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक जण याची साठवणूक करत आहे. मात्र जर कोणी अशाप्रकारे साठेबाजी करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल,” असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
“राज्यात जवळपास 60 हजार कैदी आहेत. त्यांचीही आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच जे कोणी नवीन कैदी येतील त्याला वेगळं ठेवण्यात येईल,” असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. “जनतेने एकत्र येऊ नये, शक्यतो गर्दी टाळा, घराच्या बाहेर महत्त्वाचं काम असल्याशिवाय पडू नये, वारंवार हात धुवावे, डोळ्याला, नाकाला किंवा चेहऱ्याला हात लावू नये,” अशा अनेक सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
जर शक्य असेल तर नागरिकांनी लग्न सभारंभ पुढे ढकलावेत किंवा लग्न सभारंभ हे अतिशय छोट्या प्रमाणात आटपा असेही ते म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel