मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडादिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे.
लॉकडाऊनबाबत महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची गुरुवारी बैठक पार पडली होती. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याविषयी निर्णय झाल्याची माहिती आहे.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सवलती अधिक वाढण्याचे संकेत आहेत. तर रेड झोनमध्ये ‘कोरोना’बाबत अधिक काळजी घेतली जाणार आहे.
लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.
देशात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरु झाला. 21 दिवसांचा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला. दुसरा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 3 मे असा होता.
तिसरा लॉकडाऊन 3 मे रोजी सुरु होऊन 17 मेपर्यंत चालला. 17 मेनंतर चौथ्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन सूचना द्यावा, असे पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.
click and follow Indiaherald WhatsApp channel