कोलकातामधील इडन गार्डनवर 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिला दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला. परंतू या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाला दुखापत झाली आहे.
या सामन्यादरम्यान साहाच्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटाला(अनामिका) फ्रॅक्चर झाले आहे.
बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने हात आणि मनगट तज्ञाशी सल्लामसलत केली असून त्यांनी साहाला शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सुचवले. त्यानंतर, मंगळवारी साहावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे आणि लवकरच तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बंगळुरु येथे सराव सुरु करेल, असे बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.
त्यामुळे आता साहा न्यूझीलंड दौऱ्याआधी तंदुरुस्त होण्याची सर्वांना आपेक्षा आहे. भारतीय संघ पुढीलवर्षी फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
याआधी मागीलवर्षी साहाला खांद्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे तो जवळजवळ एक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. साहाने भारताकडून आत्तापर्यंत 37 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने यष्टीमागे 103 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो यष्टीमागे 100 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा केवळ 5 वा यष्टीरक्षक ठरला आहे
click and follow Indiaherald WhatsApp channel