सोमवारी(2 डिसेंबर) दक्षिण आशियाई स्पर्धेत नेपाळ महिला विरुद्ध मालदीव महिला संघात टी20 सामना पार पडला. या सामन्यात नेपाळने 10 विकेट्स आणि 115 चेंडू राखून विजय मिळवला आहे. नेपाळच्या या विजयात अंजली चंदने एकही धाव न देता 6 विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला. याचबरोबर तिने मोठा विश्वविक्रमही रचला आहे. विशेष म्हणजे अंजलीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता.

 

अंजलीने या सामन्यात 2.1 षटके गोलंदाजी करताना एकही धाव न देता 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे ती आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये(पुरुष आणि महिला मिळून) सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन  करणारी क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी हा विक्रम मालदीवच्या मास एलिसाच्या नावावर होता. तिने याचवर्षी चीन विरुद्ध गोलंदाजी करताना 3 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

 

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करण्याचा विश्वविक्रम भारताच्या दीपक चाहरच्या नावावर आहे. त्याने याचवर्षी 10 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध 7 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात अंजलीने केलेल्या शानदार कामगिरीमुळे नेपाळने प्रथम फलंदाजी करणाऱ्या मालदीवचा डाव 10.1 षटकात 16 धावांवरच संपुष्टात आणला. मालदीवकडून केवळ हमजा नियाझ(9) आणि हाफसा अब्दुल्ला(4) यांनाच धावा करता आल्या.

 

नेपाळकडून गोलंदाजी करताना अंजलीव्यतिरिक्त करुणा भंडारीने 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या नेपाळने केवळ 5 चेंडूत 17 धावांचे आव्हान पार करत विजय मिळवला. नेपाळकडून के श्रेष्ठाने नाबाद 13 धावा केल्या. तर नेपाळला 5 धावा अतिरिक्त मिळल्या.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: