नवी दिल्ली - आपल्याला कधी कोणत्या गोष्टीची माहिती हवी असल्यास सर्वात आधी आपण गुगलवर सर्च करतो. अनेकदा बँकेबाबत काही तक्रार असल्यास गुगलवर सर्च करुन ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे संपर्क शोधले जातात. मात्र हे करताना तुमची एक चूक महागात पडू शकते. कारण हॅकर्सकडून हेल्पलाइन नंबर गुगलवर शेअर केल्याने त्याद्वारे तुमची फसवणूक करणारी टोळी सक्रीय आहे. जर तुम्ही गुगलवर सर्च करुन चुकीच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधल्यास तुम्ही हॅकर्सचा शिकार होऊ शकता. 

बंगळुरुमधील एका महिलेसोबत अशी घटना घडली आहे. तिने गुगलवर सर्च करुन कस्टमर केअरच्या नंबरवर संपर्क साधला त्यानंतर तिच्या बँक खात्यातून पैसे गायब झाले. महिलेने तिच्या फूड ऑर्डरचा रिफंड घेण्यासाठी चुकून फेक झॉमेटो कॉल सेंटरवर फोन केला त्यानंतर तिची ही फसवणूक झाली. गुगलवर सर्च करुन तिने मिळालेल्या नंबरवर डिटेल्स पाठविल्या त्यानंतर तिच्या बँक अकाऊंटमधून रक्कम काढण्यात आली. 

अशाच एक प्रकार चेन्नईमध्येही घडला. फेक नंबरवर कॉल केल्यानंतर त्या महिलेकडून यूनीफाइड पेमेंट इंटरफेस(यूपीआय) पिन, पासवर्ड आणि बँक डिटेल्स मागण्यात आले. त्यावेळी त्या महिलेला शंका आल्याने महिलेने चुकीचा पिन समोरील माणसाला सांगितला. कॉल ठेवल्यानंतर त्या महिलेच्या मोबाईलवर मॅसेज आला की त्यांच्या खात्यातून 5 हजाराचा व्यवहार चुकीचा पिन टाकल्याने रद्द केला आहे. 

अधिकृत हेल्पलाइनवर संपर्क साधा

फूड डिलिव्हरी झॉमेटोकडून पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात फेक कॉल सेंटरविरोधात तक्रार करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून असे प्रकार समोर आलेले आहेत. ज्यामध्ये फेक कॉल करुन ग्राहकांकडून बँकेचे डिटेल्ससह पिन मागविले जातात त्यातून लोकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे गुगलवर कोणतीही गोष्ट सर्च करताना अधिकृत वेबसाइट आहे की नाही याची खात्री करुन घ्या. बँकेचे डिटेल्स कोणालाही पाठवू नका. खातरजमा केल्याशिवाय अज्ञात व्यक्तींना संपूर्ण माहिती, बँकेचे पिन न देता तुमची फसवणूक टाळली जाऊ शकते.



మరింత సమాచారం తెలుసుకోండి: