पुढच्या काही वर्षात राज्यात नव्याने काही वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असून याबाबतची मंजुरी केंद्र सरकारने दिली आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते विधानपरिषदेत बोलत होते.
यावेळी महाजन म्हणाले की, आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात एकही वैद्यकीय महाविद्यालय उभारले नाही. आता मात्र उस्मानाबाद, परभणी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. तसेच केंद्र सरकारने देखील मंजुरी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आणि भाजपचे सुजितसिंह ठाकूर यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
राज्यात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी निश्चित केलेल्या ७०-३० च्या फॉर्म्युल्यात बदल करण्याची मागणी सतीश चव्हाण यांनी केली. या फॉर्म्युल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर प्रवेश प्रक्रीयेत अन्याय होत आहे,असे ते म्हणाले.
यावरून महाजन यांनी वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टीने येत्या काळात कशी वाटचाल असेल याची रूपरेषा सांगितली. तसेच भाजप सत्तेवर आल्यापासून चार वर्षांत बारामती, चंद्रपूर, जळगाव, गोंदियामध्ये वैद्यकीय महाविद्यालये उभारल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान फडणवीस सरकारच्या कार्यकाळातले शेवटचे पावसाळी अधिवेशन मंगळवारी संपले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहातील सर्व सदस्यांचे आभार मानत येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या नवनिर्मिती मीचं मुख्यमंत्री होणार असा विश्वास व्यक्त केला.
click and follow Indiaherald WhatsApp channel