शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मागणीनुसार विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. म्हणजेच मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस करूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या उभय सभागृहाचे सदस्य नाहीत.
तसेच त्यांची 27 मेपूर्वी निवड होणे आवश्यक असल्याने 9 रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी विनंती राज्यपालांनी निवडणूक आयोगाला केली होती. यावर महाविकास आघाडीचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. याशिवाय उद्धव ठाकरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असा ठाम विश्वासही त्यांनी वक्त केला आहे.
विधान परिषदेतील 2 रिक्त जागांपैकी एका जागेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने दोनवेळा राज्यपालांकडे केली. मात्र त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही. म्हणून या 9 जागांसाठी निवडणूक लवकर घेण्यात यावी अशी विनंती महाविकासआघाडीने केली होती.
निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे सरकार अस्थिर करू पाहणाऱ्यांच्या हाती अपयश लागले आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थिर होते, स्थिर राहील. कोरोनाविरोधातील लढा आम्ही यशस्वी करूच पण राज्याची अर्थव्यवस्थाही आम्ही पुन्हा सुदृढ करू, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
तसेच संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढा देत असताना काही जण राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. लोकशाहीच्या तथाकथित गळचेपीबाबत अनेकांनी राज्यपालांना पत्र लिहिली. काहींनी देव पाण्यात ठेवले होते. सरकार अस्थिर होईल आणि आम्ही 'पुन्हा प्रयत्न करू' असे अनेकांना वाटत होते, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 9 जागांची निवडणूक घेण्याची मान्यता दिली आहे. 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. लवकरच या निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम घोषित होणार आहे. विधानसभा सदस्यांच्या मतांवरून विधानपरिषदेवर सदस्य निवडून जाणार आहेत. विधानपरिषदेचे 24 एप्रिलला 8 सदस्य निवृत्त झाले. तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक होणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel