तब्बल 22 दिवस एकहाती सरकार चालवल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना सहकारी मिळणार आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांची भरती करण्यासाठी येडियुरप्पा यांना हिरवा कंदील मिळाला असून मंगळवारी या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी येडियुरप्पा यांना शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून परवानगी मिळाली. मंगळवारी सकाळी विधानसभेच्या सभागृहात भारतीय जनता पक्ष विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्याच दिवशी दुपारनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे ट्विट स्वतः येडियुरप्पांनी केले आहे. त्यामुळे संभाव्य मंत्र्यांना उमेद आली असल्यास नवल नाही.

आपण पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करू आणि राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम रुप देऊ, असे येडियुरप्पा यांनी गुरुवारी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सांगितले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात 34 जणांना घेता येऊ शकते मात्र त्यातील केवळ 13 जागा आधी भरण्यात येतील. त्यानंतर उर्वरित मंत्रिपदे भरण्यात येतील, असे भाजपच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

येडियुरप्पा यांनी 26 जुलै रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. मात्र त्यांच्या सोबत नक्की कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे यावर भाजपमध्ये एकमत होऊ शकले नव्हते. त्यामुळे सुमारे महिनाभर एकटे मुख्यमंत्रीच राज्याचा गाडा हाकत होते. यापूर्वीही येडीयुरप्पा दिल्लीला गेले होते परंतु याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता.                                


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: