मुंबई : एकीकडे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावं, यासाठी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत असताना, दुसरीकडे आता भाजप आमदर सुरेश धस यांचेही कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सुरेश धस यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्या, अशी मागणी सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

 

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपद किंवा राज्याचे प्रदेशाध्यक्षपद द्यावं अशी मागणी मुंडे समर्थकांनी केली होती.  पंकजा मुंडे यांचं बंड शांत होते ना होते तोच आता भाजप आमदार सुरेश धस यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आमदार सुरेश धस यांना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्यावं, अशी मागणी धस समर्थकांनी केली आहे. त्यामुळे मुंडे आणि धस  समर्थकांत ठिणगी पडण्याची दाट शक्यता आहे.

 

भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं.  पंकजा मुंडे आपल्या पुढील वाटचालीबद्दल नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. पंकजा मुंडे यांनी काल माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली (Pankaja Munde on His Facebook Post). यावेळी त्यांनी आत्मचिंतनासाठी आणि स्वतःशी बोलण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितलं. तसंच आपण नाराज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

       

भाजप नेत्या पंकजा मुंडे या ओबीसी असल्यामुळेच त्यांचं पक्षात खच्चीकरण केलं जात आहे, असा घणाघाती आरोप धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश आण्णा शेंडगे  यांनी केला. इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांनी हीच ती वेळ साधून, भाजपला सोडचिठ्ठी द्यावी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा, असा सल्ला मी देईन, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: