नवी दिल्ली: लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे अव्वल ठरल्या आहेत. ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रीसर्च’ या संस्थेने लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तसेच विविध मुद्द्यांवरील चर्चेतील सहभागाबाबत केलेल्या पाहणीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यानंतर सुभाष भामरे हे दुसरे सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार ठरले असून ‘टॉप टेन’ खासदारांत महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश आहे.
सुप्रिया सुळे यांनी संसदीय अधिवेशनांमध्ये मे ते डिसेंबर २०१९ या काळात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लोकसभेत एकूण १६७ प्रश्न उपस्थित केले तर विविध राष्ट्रीय विषयांवरील ७५ चर्चांमध्ये सहभाग घेतला. त्या नेहमीच हिरीरीने संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना राज्यातील जनतेचे तसेच महिलांचे प्रश्न मांडत आल्या आहेत. त्यांना याबाबत विचारले असता, माझे सरकारला प्रश्न विचारणे हे कर्तव्य असून प्रश्नोत्तराच्या तासाच मी सर्वात जास्त सक्रिय असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पहिल्या १० खासदारांमध्ये महाराष्ट्रातील ६ खासदार असून त्यात सुप्रिया सुळे अव्वलस्थानी आहेत. या यादीत कर्नाटक, अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे. विद्यमान लोकसभेतील ‘टॉप टेन’ खासदारांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील चार खासदार प्रथमच निवडून आलेले आहेत. अंदमान आणि निकोबारचे काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे, रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि भाजपचे बालुरघाटचे खासदार सुकांत मजुमदार यांचा त्यात समावेश आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel