मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आणि नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा दिला आहे. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कैक पटीने वाढत असतानाही भाजीपाला, किराणाच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करत असल्यामुळेच अजित पवार यांनी आता अधिक कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
राज्यातील जनतेने इटली, अमेरिका, स्पेनमधील कोरोना बळींपासून धडा शिकून आतातरी शहाणपणाने वागावे. जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, सफाई कामगार, या सगळ्यांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजी खरेदीसाठी गर्दी करणे बंद करावे. घरातच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केले.
कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बेजबाबदारपणाने वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे धक्का बसत आहे. आता हा बेजबाबदारपणा सहन केला जाणार नाही. कोरोनाविरुद्धचा लढा जिंकायचा असेल, बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
कोरोनाग्रस्तांची राज्यातील वाढती संख्या चिंताजनक असून या पार्श्वभूमीवर भाजी खरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर लॉकडाऊनचा उद्देशच धोक्यात आला आहे. घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणे जनतेने सुरुच ठेवले तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय करावे लागतील, असेही पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले की, राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसूल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा कोरोनाच्या संकटाविरुद्ध युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत. या सगळ्यांचे मी आभार मानतो.
click and follow Indiaherald WhatsApp channel