कोल्हापूर : जगप्रसिद्ध ‘आयर्न मॅन’ या साहसी स्पर्धेच्या धर्तीवर रविवारी कोल्हापुरात ‘लोहपुरुष’ ट्रायथलॉन व ड्यूएथलॉन ही साहसी स्पर्धा झाली. यात देश-विदेशातील सुमारे 1,200 हून अधिक स्पर्धक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यात 125 महिलांसह स्थानिक 350 खेळाडूंचा समावेश आहे.
थंड पाण्यात दोन किलोमीटर स्विमिंग, कोल्हापूर ते निपाणी महामार्गावरून 90 कि.मी. सायकलिंग, डांबर व सिमेंटच्या कठीण रस्त्यावरून 21 कि.मी. रनिंग हे संपूर्ण अंतर 10 तासांत पूर्ण करणारा कोल्हापूरचा युवा खेळाडू पंकज रावळू हा पहिला ‘लोहपुरुष’ ठरला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुमारे 400 स्वयंसेवकांची टीम सज्ज होती. कोल्हापूर स्पोर्टस् क्लब (केएससी) तर्फे आयोजित या स्पर्धेचे असोसिएट पार्टनर दै. ‘पुढारी’ होते. शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलावापासून स्पर्धेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.
राजाराम तलावात स्विमिंग, कोल्हापूर ते निपाणी महामार्गावर सायकलिंग व शिवाजी विद्यापीठ परिसरात रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप होते. स्पर्धकांना 2 कि.मी. स्विमिंग, 90 कि.मी. सायकलिंग व 21 कि.मी. रनिंग हे अंतर 10 तासांत पूर्ण करावे लागले. तब्बल 10 तास सुरू असणार्या या स्पर्धेची सांगता सायंकाळी बक्षीस वितरणाने झाली.
click and follow Indiaherald WhatsApp channel