भोर विधानसभेवर कोणाला निवडून द्यायचे हे जनता ठरवणार आहे. त्यामुळे आधी जनतेचा कौल घ्या आणि मग भोरची जागा जिंकण्याच्या वल्गना करा, असा टोला आमदार संग्राम थोपटे यांनी शिवसेनेला लगावला.
शिवगंगा खोरे, शिंदेवाडी ते गुनंद भागातील विविध गावातील नव्याने मंजूर विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन आमदार थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार थोपटे बोलत होते. घोटावडे फाटा (ता. मुळशी) येथे सोमवारी (दि.9) शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीची गुलामगिरी मोडून काढून भोरचा पुढील आमदार शिवसेनेचा करा, असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांना केले होते. या पार्श्वभूमीवर थोपटे यांना पत्रकारांनी विचारले असता थोपटे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
आमदार थोपटे म्हणाले की, भोरच्या जागेवर कोणाला निवडून द्यायचे हे पक्षाचे पदाधिकारी ठरवणार नसून जनता ठरवणार आहे. त्यामुळे शिवसेनेने अगोदर जनतेचा कौल घ्यावा आणि मग भोरची जागा जिंकण्याची वल्गना करावी. शिंदेवाडी ते गुनंद पर्यंत विविध विकासकामांच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून भोर विधानसभा मतदारसंघात विकासकामे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाचा धडाका आहे. या कार्यक्रमासाठी भोर तालुका कॉंग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, भोर पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, दिलीप बाठे, मारुती गुजर, गावातील बूथ कमिटीचे मेंम्बर, तरुण कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.
click and follow Indiaherald WhatsApp channel