पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ऑगस्टपासून परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान ते तीन देशांना भेटी देणार आहे. यात फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन या देशांन ते भेटी देतील. या भेटींमध्ये पंतप्रधान मोदी तेथील नेत्यांशी द्विपक्षीय तसेच परस्पर हितांच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
मोदी 22 रोजी संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील यानंतर ते 24 ऑगस्ट रोजी बहरीनला रवाना होतील. बहरिनला भेट देणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. बहरीनचे शेख हमाद बिन ईसा अल खलीफा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विशेष मेजवानीचे आयोजन केले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी मनामामध्ये श्रीनाथजी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू करतील. गेल्या काही देशांत बहरीन आणि भारत यांच्या संबंधांमध्ये सुधारणा झाली असून, दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढला आहे.
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये बियारेत्ज येथे 45व्या जी-7 राष्ट्रांच्या बैठकीला उपस्थित राहतील. विदेश मंत्रालयाचे सचिव टी. एस. तिरुमूर्ती यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी फ्रान्समध्ये पोहोचतील. त्याच दिवशी त्यांची सायंकाळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रो यांच्याशी भेट होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक चर्चा झाल्यानंतर पुन्हा शिष्टमंडळ स्तरावरची बैठक होईल.’
पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. तसेच एअर इंडियाच्या दोन विमान अपघातामधील मृतांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांच्या निमंत्रणामुळे फ्रान्स दौऱ्यावर जात आहेत.
परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि फ्रान्स यांच्यातील संरक्षण सहकार्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमध्ये संरक्षण, नौकावहन, अंतराळ सहकार्य, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य करण्यावर चर्चा होणार आहे. फ्रान्ससोबत जैतापूर अणूऊर्जा योजना पुढे घेऊन जाण्यावर चर्चा होणार आहे. भारत आणि फ्रान्स आंतरराष्ट्रीय सौर संबंध पुढे घेऊन जाण्याच्या विचारात आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: