मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २७०२ झाडं कापण्यासाठी किंवा पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्षतोड करण्यास परवानगी दिली.

मात्र त्यानंतर शनिवार आणि रविवारी मुंबईकरांनी या निर्णयाविरोधात आरेमध्ये मानवी साखळी करुन निषेध व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी मुंबईकरांना या विरोधात आवाज वाढवण्याचे आवाहन केले आहे.

अमित ठाकरेंनी फेसबुकवर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे म्हटले आहे की, चार दिवसांपूर्वी मुंबईच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरेचे २७०० झाडे कापण्याचा निर्णय घेतला. या निर्णया अगोदर महानगर पालिका व एमएमआरडीएच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील स्थानिकांशी चर्चा केली. या चर्चेत ८२ हजार लोकांनी त्यांच्या तक्रारी नोंदवल्या जर ८२ हजार लोकांच्या तक्रारी असतील तरीही आपण हा झाडं कापण्याचा निर्णय घेत असू तस संशय हा कुठेतरी निर्माण होणारच.

यावेळी ते हे देखील म्हणाले की, आम्ही कुठेही विकासाच्या विरोधात नाही, विकास हा नक्की व्हावा पण निसर्गाचा बळी देऊन नाही. सध्या संपूर्ण जगावर ग्लोबल वार्मिंगचे खूप मोठे संकट आहे. अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीसाठी सगळं जग एकवटलं होतं व हळहळ व्यक्त करत होतं.

हे सगळं सुरू असताना मुंबईचा जो श्वास आहे आरे हे आपण नष्ट करायला निघालो आहोत. यासारखी दुर्देवी गोष्ट नाही. म्हणून या व्हिडिओद्वारे मी सर्वांना आवाहन करतो की आवाज मोठा करा, व्यक्त व्हा मी तुमच्या सोबत आहे. मी निसर्गासोबत आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: