राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा तसेच ग्रामीण रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार दिलीप कांबळे, योगेश टिळेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका लता धायरकर, मंगला मंत्री, हिमाली कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यात रस्ते विकासाला गती देण्यात आली असून राष्ट्रीय महामार्ग 17 हजार किलोमीटरने वाढविण्यात आले आहेत. राज्यात 10 हजार किलोमीटर तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 30 हजार किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. मुंबई, पुणे व नागपूर येथील मेट्रो प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करण्यात येत आहे.

राज्यात एकूण 265 रेल्वे फाटक असून 3 वर्षांपूर्वीच या रेल्वेफाटकावर उड्डाणपूल व्हावे, यासंदर्भात निर्णय घेत 170 उड्डाणपुलांची कामेही पूर्णत्वास आली आहेत, उर्वरित उड्डाणपुलांची कामेही 2 वर्षांत पूर्ण करण्यात येतील, असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी राज्य शासनाच्या योजनांचा सामान्य नागरिकांना लाभ होत असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक करताना महापौर मुक्‍ता टिळक यांनी घोरपडी उड्डाणपुलाचे काम 36 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: