भाजप आणि शिवसेनेची पहिली यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. काही विद्यमान आमदारांना यामध्ये संधी देण्यात आली. तर काहींचा पत्ता कट करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरूडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. या ठिकाणच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता मात्र कापण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात मेधा कुलकर्णी या नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

पण त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच त्यांनी यावेळी एक गौप्यस्फोट केला. आपल्याला चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची ऑफर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली असल्याचे मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

आमचे पण पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात ठरले आहे, बाहेरचा उमेदवार कसबा विधानसभा मतदारसंघात नको, अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. काही तास या फलकबाजीला होत नाही तोच कोथरूड भागात दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे. आम्ही कोथरूडकर, अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात आल्याचे पहायला मिळाले होते.

भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने ही फलकबाजी करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यानंतर भाजपच्या पहिल्या यादीत चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी या नाराज असल्याचे म्हटले जात होते.

दरम्यान, आपल्याला फोन करून कोथरूडमधून निवडणूक लढवण्याची राज ठाकरे आणि जयंत पाटील यांनी ऑफर दिली होती. पण त्याला आपण नकार दिल्याचे त्या म्हणाल्या. तसेच भाजपसोबतच आपण राहणार असून चंद्रकांत पाटील यांना मोठ्या फरकाने निवडून आणू आणि पक्षविरोधी काम करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: