सोलापूर: राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या दहा रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला आहे. तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. ते शनिवारी बार्शी येथील प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपवर टीकेची झोड उठवली. विशेषत: त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दहा रुपयांमध्ये सकस थाळी देण्याच्या घोषणेचा समाचार घेतला. यापूर्वी शिवसेनेकडून राज्यात एक रुपयात झुणका भाकर अशी योजना सुरु करण्यात आली होती.
मात्र, पुढे त्याच काय झालं? झुणका भाकर केंद्रे बंद पडली आहेत. या केंद्रांची जागा हडपण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवालही त्यांनी विचारला.
यापूर्वी अजित पवार यांनीही शिवसेनेच्या योजनेवर टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेने आता दहा रुपयांत जेवण आणि एका रुपयात आरोग्य तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे. मग पाच वर्षे काय झोपला होता का, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
तत्पूर्वी शनिवारी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. या वचननाम्यात आणखी काही महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली आहे. वचननाम्यावर बारकोडही प्रसिद्ध करण्यात आलाय. हा बारकोड स्कॅन केल्यावर तुमच्या मोबाईलवरही हा वचननामा तुम्हाला वाचता येऊ शकेल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
click and follow Indiaherald WhatsApp channel