मुंबई – बंडखोरी करत भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी पाठिंबा दिल्यानंतर भाजपसोबत मिळून अजित पवारांनी सत्ता स्थापन केली. अजित पवारांना शपथविधीनंतर अवघ्या दोन दिवसांतच सिंचन घोटाळा प्रकरणातून क्लीन चीट मिळाल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांना एसीबीने जवळपास ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट दिली असल्याची चर्चा आहे. सिंचन घोटाळ्यातील ९ प्रकरणे पुराव्याअभावी बंद करण्यात आली आहेत. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या ९ फाईल्स बंद करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिले आहे, त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार एसीबी प्रमुखांनी त्यांना प्रतिक्रिया देत म्हटले की, बंद करण्यात आलेली प्रकरणे रुटीन आहेत. काही फौजदारी प्रकरण होती, काही विभागीय होती तर काही चौकशीची होती. ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे. कृपया क्लीन चीट अजिबात नाही.

आमच्याकडे ३००० पेक्षा अधिक तक्रारी आहेत. अजित पवारांचा बंद केलेल्या फाईल्सशी काहीही संबंध नसल्याचे एसीबीने म्हटले आहे. तसेच या प्रकरणी भविष्यात काही पुरावे मिळाल्यास या फाईल्स पुन्हा उघडण्यात येतील असेही एसीबीने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात सिंचन घोटाळा आघाडी सरकारच्या काळात झाला होता. राज्यात कोट्यावधी रुपयांच्या या घोटाळ्याची जोरदार चर्चा होती. लाचलुचपत विभाग, सक्तवसुली संचालनालय, एसीबीकडून या घोटाळ्याचा तपास सुरु होता.

भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असताना सातत्याने सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणावरुन अजित पवारांवर टीका करत होते. पण त्याच भाजपला अजित पवारांनी पाठिंबा देत शपथविधी घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांना सिंचन घोटाळ्यातील काही फाईल्स बंद झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: