मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधातील आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधान आणि महात्मा गांधीच्या विचारांना वाचवण्यासाठी असल्याचं मत एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधातील सभेत बोलत होते.

 

असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “आम्ही हे आंदोलन आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी करत आहोत. या संविधानाची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. त्यात आम्हाला अनेक अधिकार दिले आहेत. जोपर्यंत मी जीवंत आहे, तोपर्यंच मी या देशात राहणार आहे. ही लढाई संविधानाला आणि महात्मा गांधींच्या विचारांना वाचवण्याची लढाई आहे.” आता क्विट भाजप, क्विट मोदी आणि क्विट अमित शाह घोषणा देण्याची वेळ आल्याचंही ओवेसी यावेळी म्हटले.

 

“देशाला जिन्नांच्या रस्त्यावर घेऊन जाऊ सकत नाही”

असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर धर्माच्या आधारावर भेदभाव केल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “देशात कधीही धर्माच्या नावावर भेदभाव केला गेला नाही. मात्र सध्या भाजपकडून धर्माच्या नावावर देशाला विभक्त करण्याचा डाव सुरु आहे. आज आम्ही देश वाचवायला रस्त्यावर उतरलो आहोत. या देशाला आम्ही जिन्नांच्या रस्त्यावर घेऊन जाऊ सकत नाही.”

 

देशाचे पंतप्रधान नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या प्रश्नावर खोटे बोलत आहेत. नागरिकत्व देण्याच्या निमित्ताने ते भेदभाव करत आहेत. आसाममध्ये एनपीआर लागू झाला, तर त्याचा सर्वात जास्त त्रास महिलांना होणार आहे. एनपीआर आणि एनआरसी हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असाही आरोप ओवेसी यांनी केला.

 

“कुणालाही संशयास्पद ठरवण्याचा अधिकाऱ्यांना अधिकार”

हे कायदे अधिकाऱ्यांन अमर्याद अधिकार देत असल्याचा मुद्दाही ओवेसी यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “या कायद्यानुसार अधिकारी कुणालाही संशयास्पद नागरिक ठरवू शकतो. असा अधिकारच त्यांना या कायद्यात दिला आहे. एनपीआर झाला, तर एनआरसी देखील नक्की यशस्वी होईल. हे सरकारचं एक कट-कारस्थान आहे.”

 

“भारतामध्ये 28 टक्के लोकांकडे जन्माचा दाखला नाही”

भारतामध्ये जवळपास 28 टक्के लोकांकडे जन्माचा दाखला नाही. यात मुस्लीम आणि दलितांचा जास्त समावेश आहे, असंही ओवेसी यांनी नमूद केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावून एनआरसी, एनपीआर आणि सीएएवर स्थगिती लावण्याची घोषणा करावी, अशी मागणीही ओवेसी यांनी केली. ओवेसींनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसलाही यावर त्यांच्या भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं.

 

या सभेला विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील, खासदार इम्तियाज जलील आणि आमदार वारीस पठाण हेही उपस्थित होते. यावेळी कपिल पाटील यांनी ही लढाई तिरंग्याखाली करण्याच्या ओवेसी यांच्या सल्ल्याचं स्वागत केलं. तसेच मोदी-शाहांची सत्ता लवकरच संपणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, “हे लोक नथूराम गोडसेवादी, हिटलरवादी आहेत. त्यांची चाल आपण ओळखू या. महाराष्ट्रात एक बदल झाला आहे. मी यापूर्वी कधीही शिवसेनेला पाठिंबा दिला नव्हता. मात्र, पण भाजपला रोखण्यासाठी मी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. या देशातून मोदी शाह यांना हटवलं पाहिजे. त्यासाठी सर्वांना एकत्र यावं लागेल.”

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: