नरेंद्र मोदी सरकारने जम्मू काश्मीरसंबंधी ऐतिहासिक निर्णय घेत राज्याला स्वतंत्र दर्जा देणारे वादग्रस्त कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर एकीकडे भारतासोबतचा व्यापार पाकिस्तानने बंद केला, तर दुसरीकडे समझोता एक्स्प्रेस, भारतीय चित्रपटांवर बंदी असे अनेक निर्णय पाकिस्तानने घेतले. तशातच पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद हुसेन यांनी एक ट्विट केले होते. त्या ट्विटला भारताची नेमबाज हिना सिधू हिने सडेतोड उत्तर दिले आहे.
पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसेन यांनी पंजाबच्या जवानांना आवाहन करणारे एक ट्विट केले होते त्यात त्यांनी, भारतीय लष्करातील सर्व पंजाबी जवानांनो, काश्मीरमध्ये जो अन्याय आणि अत्याचार सुरू आहे, त्यात सहभागी होऊ नका. त्या भागात सेवेवर जाण्यास तुम्ही नकार द्या, असे म्हटले होते. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यातच नेमबाज हिना सिधूने त्यांना चांगलेच धारेवर धरले.
भारताच्या सुरक्षेसाठी पंजाबी लोक कायमच तत्पर राहिले आहेत. मी पंजाबी आहे आणि सिधू आहे. शिख समाजाचा इतिहास तुम्ही वाचला असाल अशी मला अपेक्षा आहे. त्यामुळे लष्कराचा विषय बाजूला राहू दे .. आमची (भारताची) सुरक्षा करण्यासाठी आम्ही लष्करी सेवेतच भरती होण्याची गरज नाही, असे हिनाने फवाद यांना सुनावले.
click and follow Indiaherald WhatsApp channel