
पुणे – इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलाचे संकेत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या तयारीच्या चर्चेतून मिळू लागले आहेत.
राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीबाबत तसेच यातून इंदापूरच्या जागेबाबत कोणताच ठोस निर्णय होताना दिसत नसल्याने याशिवाय पाटील यांनी भाजपमध्ये जावे, असे जनमत असल्याने कदाचीत माजीमंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असे अंदाज बांधले जात आहेत. यामुळे इंदापूर विधानसभा मतदार संघातील राजकीय स्थितीत मोठे बदल होणार आहेत.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या तंबूत दाखल झाल्यास इंदापूर विधासनभा मतदारसंघात आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आघाडीच्या जागावाटपात माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकरीता इंदापूर मतदार संघ सोडायचा की जुन्या सुत्रानुसार विद्यमान आमदार असलेल्या पक्षाकडेच हा मतदार संघ राहणार, याबाबत कोणातच निर्णय होत नसल्याने भाजपच्या गळाला कॉंग्रेसचे मातब्बर नेते असलेले हर्षवर्धन पाटील लागण्याची शक्यता आहे.
माजीमंत्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी युतीच्या नियमानुसार इंदापूरची जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या कोट्यातील इंदापूरची जागा भाजपच्या ताब्यात जाणार का? याबाबतही शंका घेतली जात आहे. यामुळे पाटील यांनी भाजपाऐवजी शिवसेनेत का प्रवेश केला नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आला आहे. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी अधिकृत वक्तव्य केले नाही. त्यामुळे या चर्चा पेल्यातील वादळ ठरणार काय, याची उत्सुकता लागूनराहिली आहे.