साखर कारखान्याच्या थकबाकीप्रकरणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे पंकजा मुंडे यांचा पन्नगेश्वर शुगर्स लि. हा खासगी साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या स्थापनेपासून अद्यापपर्यंत पानगाव ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर तसेच इतर करांचा भरणा केलेला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे आंदोलन सुरू केले आहे. पानगाव ग्रामपंचायतीपुढे 11 दिवस धरणे आंदोलन करूनही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नऊ आंदोलनकर्ते हे रेणापूर ग्रामपंचायतीपुढे आमरण उपोषण करीत आहेत.
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी 2001 मध्ये पानगाव येथे पन्नगेश्वर खासगी साखर कारखाना उभारला; मात्र 2001 ते 2019 या जवळपास 18 वर्षातील ग्रामपंचायतीचा कुठलाही कर पन्नगेश्वर साखर कारखान्याने भरलेला नाही. तसेच पानगाव ग्रामपंचायतीने विविध योजनेत मोठा घोळ केल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
प्रशासनाकडून या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचाही आंदोलकांचा आरोप आहे.मल्लिकार्जुन चंदनकेरे, राजू माने, सुशीलाबाई माने, जनार्दन रामरुळे, राजेंद्र बोयने, फुलाबाई माने, विजयकुमार इंगळे, राधा इंगळे आणि त्रिवेनाबाई चाफेकानडे यांचा आंदोलकांत समावेश आहे. नऊपैकी चार आंदोलकांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तरीही प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel