नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड  यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आगामी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.

 

नवी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते कामालादेखील लागले आहेत. प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे.  मात्र, राज्यात कोरानाचं संकट आल्यामुळे ही निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याअगोदर मनसेने ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

 

जितेंद्र आव्हाड यांचं पत्र

“राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. देशात 101 जण कोरोना बाधित आहेत. यापैकी राज्यात 31 जण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी म्हणून सर्व शाळा, कॉलेजला 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व मॉल्स, चित्रपट थिएटर्सदेखील बंद करण्यात आली आहेत.

 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन काही शहरांमध्ये सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. नजिकच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नियत वेळी होणार आहेत.

 

उपरोक्त निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक एकमेकांच्या संपर्कात येतील. त्यामुळे या संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगपालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी, असे सुचविण्यात येत आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी पत्रात म्हटलं आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: