उदयनराजे भोसलेमध्ये शिवप्रेमींच्या मनातील प्रतिक्रिया देण्याचे धाडस नसल्यानेच ते मुख्य मुद्दा सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी महाराष्ट्र देशाला दिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय असा प्रश्न पडतो असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं. पुस्तकाबद्दल ऐकून वाईट वाटलं. महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

 

तर दुसरीकडे उदयनराजे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर देखील जोरदार घणाघात केला आहे. आज कोणालाही जाणता राजा उपाधी दिली जाते, कोणाला दिली गेली मला माहित माहित नाही. पण जाणता राजा फक्त एकच छ.शिवाजी महाराज. अस म्हणत उदयनराजे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर कोणालाही जाणते राजे म्हणून घेण्याचा अधिकार नाही, आणि जे त्यांना जाणते राजे म्हणत असतील ते शिवाजी महाराजच अपमान करत असल्याचे देखील उदयनराजे म्हणाले.

 

याबाबत महाराष्ट्र देशाला प्रतिक्रया देताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले  उदयनराजे भोसलेंनी विषयांतर न करता मुख्य मुद्द्यालाधरून बोलावे . छत्रपती शिवरायांची नरेंद्र मोदींशी तुलना त्यांना मान्य आहे का? तसेच पुस्तकाबद्दल  उदयनराजेंची प्रतिक्रिया सर्वात शेवटी आली, याचे कारण रा.स्व. संघाकडून त्यांना उशिरा परवानगी मिळाली असावी असा संशय येत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

 

उदयनराजेंनी माध्यमांसमोर जी भूमिका व मतप्रदर्शन व्यक्त केले ते त्यांचे स्वतःचे वाटत नाही. त्या पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या केंद्रीय कार्यलयात झाले आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या मनातील प्रतिक्रिया देण्याचे धाडस दाखवता येत नसल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली असून ही प्रतिक्रिया त्यांचा कमकुवतपणा दर्शवते आहे असेही लवांडे पुढे म्हणाले.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: