अहमदनगर – भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या दालनात कोंडून अधिवेशनात गोंधळ घालू, असा इशारा दिला. तातडीने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे केली.
वेळोवेळी इंदुरीकर महाराज महिलांचा आपल्या कीर्तनातून अपमान करतात. त्याचबरोबर माझ्यावर त्यांच्या समर्थकांनी खालच्या पातळीवर समाजमाध्यमात, फोनवर टीका-टिप्पणी केली आहे. त्यांच्यावर यासाठीही स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देसाई यांनी केली. त्यांच्यावर पीसीपीएनडीटी कायद्यानुसार लवकर कारवाई केली नाही, तर इंदुरीकर यांना अकोलेत जाऊन काळे फासू, असा इशाराही त्यांनी दिला.
तृप्ती देसाई मोठ्या पोलीस बंदोबस्तात पुण्याहून भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह नगरला आल्या होत्या. त्यांना नगरमध्ये आल्यास जोरदार प्रतिउत्तर दिले जाईल, असा हिंदू राष्ट्र सेनेच्या स्मिता अष्टेकर यांच्यासह काही संघटनांनी इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेत तृप्ती देसाई यांना संरक्षण दिले होते.
click and follow Indiaherald WhatsApp channel