महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकार्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. जर राणेंचा भाजपा प्रवेश झाला, तर कोणता झेंडा हाती घ्यायचा? असा प्रश्‍न या पदाधिकार्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘राणेंना त्यांचा पक्ष भाजपामध्ये विलीन करायचा आहे’ असे वक्तव्य केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील काही पदाधिकार्‍यांनी ‘जर राणे भाजपात आले तर आमचे ठरले’, असे सांगत ‘आम्ही शिवसेनेत जाऊ’ असे खासगीत बोलताना सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर यांच्यासह अनेक पदाधिकारी देखील शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, ‘राणेंना भाजपामध्ये घेऊ नका’ अशी विनंती निवेदनातून करणार आहेत. तसेच ‘जे स्वतःच्या पक्षाचे होऊ शकले नाहीत ते भाजपाचे काय होणार?’ असे देखील या निवेदनातून भाजपा पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहेत. याआधी देखील राणेंच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवेळी या पदाधिकार्‍यांनी ‘राणेंना भाजपामध्ये घेऊ नका’, असे सांगत राणेंचा पक्ष प्रवेश थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

त्यामुळे आता देखील राणेंना भाजपामध्ये न घेण्यासाठी हे पदाधिकारी मोर्चे बांधणी करत आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, संदेश पारकर यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांची शिवसेनेशी जवळीक वाढली असून, हे सर्व नेते शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत हे या नेत्यांना शिवसेनेत घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: