औरंगाबाद : उद्धव ठाकरे मला काही ना काही देतील, त्यांनी मला शब्द दिलाय, नैराश्य आहे. पण, शिवसेना सोडणार नाही, मरीन तर भगव्यातच अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे औरंगाबाद मधील नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यसभा उमेदवारी न मिळाल्यानंतर दिली आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून थोडं नैराश्य जरूर आहे. पण शिवसेना पक्ष कधीच सोडणार नाही, मी त्यांपैकी नाही असंही खैरे यांनी स्पष्ट केलं.
मी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्याने मला राज्यसभेची उमेदवारी मिळावी अशी शिवसैनिकांची इच्छा होती. मात्र, उद्धव ठाकरे माझं पुनर्वसन जरूर करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नवीन लोकांना संधी दिली पाहिजे असंही खैरे म्हणाले. भाजपने भागवत कराड यांना उमेदवारी दिल्याची बाब मला खटकली असंही खैरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने निष्ठावान नेते राजीव सातव यांना उमेदवारी दिलेली असताना शिवसेना आणि भाजपने मात्र ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचं चित्र आहे. सेना-भाजपने गेल्या वर्षभरात पक्षात प्रवेश करणाऱ्या आयाराम नेत्यांना तिकीट दिलं आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel