बॉलीवूडमध्ये फिट अभिनेत्री कोण?… असं विचारलं तर साहजिकच सर्वांच्या तोंडात शिल्पा शेट्टीचंच नाव येईल. आपला आहार आणि व्यायाम याबाबत शिल्पा खूपच दक्ष आहे. त्यामुळेच ती या वयातही स्लीमट्रिम आणि सुंदर दिसते. शिल्पा आपला फिटनेस मंत्रा आपल्यापुरता मर्यादित न ठेवता चाहत्यांनाही देते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती व्यायाम, योगा, हेल्दी रेसिपी यांचे व्हिडिओ सातत्याने शेअर करत असते.
आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून फिटनेसचे धडे देणारी शिल्पा आता संपूर्ण भारताला फिट ठेवण्यासाठी सरकारलाही सल्ले देणार आहे. केंद्र सरकारच्या फीट इंडिया चळवळीच्या सल्लागार समितीत सदस्य म्हणून शिल्पा शेट्टीची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशातील नागरिक निरोगी आणि फीट राहावं यासाठी केंद्र सरकार फिट इंडिया चळवळ सुरू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजेच २९ ऑगस्ट, २०१९ ला फिट इंडिया चळवळीला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. शारीरिक कार्य आणि खेळांना नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावं, हे या चळवळीचं उद्दिष्ट आहे.
फीट इंडिया चळवळ राबवण्यासाठी सरकारने सल्लागार समितीची स्थापना केली आहे. क्रीडामंत्री किरेन रिजीजू या समितीचे अध्यक्ष आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह अभिनेता मिलिंद सोमणचाही या समितीत समावेश आहे.
सरकारच्या फिट इंडिया चळवळीचा भाग होण्यास मिळालं यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आनंद आणि आभार व्यक्त केला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel