आता गाजरं दाखवण्यासाठी हौसे नवशे गवशे येतील त्याच्या गाजराला भुलू नका, नाहीतर पुन्हा एकदा आपण अनेक वर्षे मागे जाऊ, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी हिंगोलीतील ताकतोडा येथील जाहीर सभेत केले. अजित पवार यांनी आपल्या भाषणात सरकारच्या फसव्या योजनांवर हल्लाबोल करतानाच अनेक विषयांना हात घातला.

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली आहे. इतके वर्षे जुने प्रकरण आता बाहेर काढले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझे इतकेच सांगणे आहे की विचाराची लढाई विचारांनी लढली पाहिजे, असं नीच राजकारण करू नका असा सल्ला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला.

या सरकारने लोकांचं जगणं मुश्कील केलं आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात विष कालवण्याचे काम सरकारने केले. ज्यांनी विष कालवण्याचे काम केले त्यांना याच मातीत गाडा असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.हा गेला, तो गेला, हा जाणार, तो जाणार अशा बातम्या रोजच झळकत आहेत. ज्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांनाच आज मुख्यमंत्री भाजपात समाविष्ट करत आहेत असेही धनंजय मुंडे म्हणाले.

महाराष्ट्रात जे मंत्री महापुरात असंवेदनशील वागत होते त्यांना जोड्याने हाणले पाहिजे, असे मी म्हणालो होतो वाईट काय होते. जनतेचा जीव जात आहे आणि तुम्ही सेल्फी कसले काढता ? अंबानीच्या मालकीच्या वृतवाहिनीने माझ्याविरोधात बातमी लावली. विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम कसे करायचे यासाठीच यांच्या मालकीच्या वृतवाहिन्या बसल्या आहेत असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

भाजपची ही महाजनादेश यात्रा येत्या काळात महाआक्रोश यात्रा असेल त्या महाआक्रोशाने मुख्यमंत्र्यांना त्यांची महाजनादेश यात्रा जराही पुढे सरकवता येणार नाही असा इशारा डॉ.अमोल कोल्हे यांनी दिला.आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. ही भाकरी नुसती हिंगोलीत नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात फिरवा असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिवस्वराज्य यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून शेवटची सभा हिंगोली जिल्हयातील ताकतोडा येथे पार पडली. या सभेला आमदार रामराव वडकुते, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण आदींसह हिंगोली जिल्ह्य़ातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: