प्रेक्षकांच्या जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी अभिनेता सैफ अली खान सज्ज झाला असून आगामी ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात जुने गाजलेले ओले ओले हे गाणे रिक्रिएट केले जाणार आहे. या चित्रपटासाठी ‘ओले ओले’ या सुपरहिट गाण्याचे रिमिक्स व्हर्जन रिक्रिएट करण्यात आले आहे. संगीतकार तनिष्क बागची यांनी बनवलेले हे गीत शब्बीर अहमद यांनी लिहिले असून यश नार्वेकरने गायले आहे.
१९९४ साली आलेल्या ‘ये दिल्लगी’ या चित्रपटात ‘ओले ओले’ हे गाणे होते. हे गाणे सैफ अली खान आणि काजोल यांच्यावर चित्रित करण्यात आले होते आणि चित्रपटात अक्षय कुमार देखील मुख्य भुमिकेत होता. या रिक्रिएट गाण्याचा अनुभव सांगताना तनिष्क म्हणाला, या गाण्याचे हे नवीन आणि फ्रेश व्हर्जन आहे. पण या गाण्याची फिलींग आणि वाईब्ज ओरिजनल सारखीच राहील. गाण्यावर शब्बीर अहमद आणि मी मिळून काम केले. त्यांनीच हे गाणेदेखील लिहिले असून गाणे ओरिजनल सारखेच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ९० च्या दशकातील प्रसिध्द गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी हे गाणे गायले होते.
अभिनेत्री तब्बूदेखील ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. सैफ हा या चित्रपटात ४० वर्षीय वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर, त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही झळकणार आहे. हा तिचा पदार्पणाचा चित्रपट आहे. ती सैफच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. ‘जवानी जानेमन’ हा चित्रपट ३१ जानेवारी २०२० ला रिलीज होणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel