बीड : कोरोनामुळे राज्यात संचारबंदी असताना पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करा, पोलिसांना त्यांचे काम करू द्या, ते आपल्या हिताचे आहे असे आवाहन जनतेला केले आहे.
आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये मुंडे म्हणतात,कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी पुढील २० दिवसांसाठी देश लॉकडाऊन आहे. गृहमंत्र्यांनी कालच याबाबत अत्यंत गंभीर राहण्याचे आवाहन करत राज्यातील पोलिसांना काही विशेष अधिकार दिले आहेत.
पुढे मुंडे म्हणतात,मला काही ठिकाणांवरून पोलिसांनी बलप्रयोग, लाठी-काठी केल्याच्या, नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याच्या तक्रारी फोनवरून सांगितल्या आहेत. आपणांस घालून दिलेले नियम पाळल्यानंतर ही वेळ का येईल? विशेष म्हणजे हे नियमही आपल्या सुरक्षेसाठीच घालून दिलेले आहेत. पोलीस, डॉक्टर, नर्स हे सर्वजण आपला जीव धोक्यात घालून आपल्यासाठीच अहोरात्र काम करत आहेत, त्यांचा विचार करा. त्यांच्या कुटुंबियांचा विचार करा.
त्यांचा मानसन्मान ठेवा, आदर ठेवा, त्यांच्या सूचनांचे पालन करा. सर्वकाही तुमच्या हिताचेच आहे. कोणीही कायदा हातात घेतल्याचे खपवून घेतले जाणार नाही असं मुंडेंनी म्हटलं आहे.
लक्षात असुद्या, पुढील २० दिवस अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडायचे नाहीच. जर काही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आपण जात असाल तर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जावे. कुटुंबातील फक्त एक सदस्याने जावे, तेही सर्व सावधगिरी बाळगून.घरात रहा, कोरोनाला हरवा असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel