जन्माष्टमीची रात्र सरल्यानंतर गोविंदांनी दहीहंडी फोडण्यासाठी कूच केली. मुंबईत दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. दहीहंडीसाठी थर लावताना यंदा तब्बल ५१ गोविंदा जखमी झालेत. पालिका आणि सरकारी रुग्णालयात या गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यापैकी २७ गोविंदांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

जखमी गोविंदांची आकडेवारी

  • नायर रुग्णालय – ६
  • केईएम रुग्णालय -१२
  • सायन रुग्णालय – ४
  • जे.जे. रुग्णालय – १
  • जसलोक रुग्णालय – १
  • गोवंडी शताब्दी रुग्णालय – २
  • एम.टी. अगरवाल रुग्णालय – १
  • राजावाडी रुग्णालय – १०
  • कुपर रुग्णालय – ४
  • ट्रॉमा केअर रुग्णालय – ३
  • व्ही. एन. देसाई रुग्णालय – १
  • कांदिवली शताब्दी रुग्णालय – ६

केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘काही गोविंदांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. १२ वर्षीय विग्नेश काटकरच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तो काळाचौकी येथील गोविंदा पथकातील आहे. वरळी येथील उदय क्रीडा मंडळ गोविंदा पथकातील २० वर्षांच्या अनिकेत सुतारच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. तर लालबागमध्ये राहणारा राहणारे ४१ वर्षांचे सुनील सावंत हे साई देवस्थान गोविंदा पथकातील गोविंदा जखमी झालेत. या सर्वांवर सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे’’

पालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. रमेश भारमल म्हणाले की, ‘‘एका गोविंदाच्या नाकाला फ्रॅक्चर झालं असून दुसऱ्या गोविंदाच्या हातापायाला फ्रॅक्चर झालं आहे. या दोघांवरही सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. याशिवाय जखमी गोविंदांना तातडीनं उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये’’

यंदाच्या वर्षी सांगली आणि कोल्हापुरातील पूर, तसंच माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या निधनामुळे अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव शांततेत साजरा करण्यात आल्या. अनेक मोठ्या दहीहंडी रद्द करण्यात आल्या. त्यामुळे यंदाच्या वर्षी जखमी गोविंदांच्या संख्येत घट दिसून येते आहे.


Find out more: