प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार किरण नगरकर यांचे गुरुवारी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी मराठीबरोबरच इंग्रजीतही साहित्य लिखाण केले होते.
मराठीतील ‘सात सक्कं त्रेचाळीस’ आणि ‘ककल्ड’ या त्यांच्या २ कादंबऱ्या प्रचंड गाजल्या. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हिंदू लिटररी प्राइज, जर्मनीचा ऑर्डर ऑफ मेरिट आणि साहित्य अकादमीच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
दरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.नगरकर यांचा जन्म २ एप्रिल १९४२ मध्ये मुंबईत झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी पदवी तर मुंबईच्या एसआयइएस कॉलेजमधून इंग्लिश विषयात पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले.
ते मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे कादंबरीकार, नाटककार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे कुटुंब ब्राम्हो समाजाची तत्वे मानणारे होते. किरण नगरकरांची पहिली कादंबरी इ.स. १९६७-६८ च्या सुमारास ‘अभिरुची’ मध्ये प्रसिद्ध झाली होती.
याशिवाय ‘कबीराचे काय करायचे? आणि ‘बेडटाईम स्टोरी’ ह्या दोन नाट्यकॄती त्यांच्या नावावर आहेत. ‘स्प्लिट वाईड ओपन’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel