कोलकाता : भाजपच्या राज्यसभेच्या खासदार आणि अभिनेत्री रुपा गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जीला कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मद्यपान करुन कार चालवताना झालेल्या दुर्घटनेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. 21 वर्षीय आकाशवर कोलकाता पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपघात आणि कारवाईनंतर खासदार रुपा गांगुली यांनी पंतप्रधान मोदींना टॅग करुन ट्विट केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नशेत असलेल्या आकाश मुखर्जीची कार दक्षिण कोलकात्यातील एका क्लबच्या भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात कारचं नुकसान झालं आहे. स्थानिकांनी आकाश नशेत असल्याचा आरोप केला आहे. कार सुसाट होती, ती भिंतीवर आदळल्याने सुदैवाने या दुर्घटनेत अनेकांचा जीव वाचल्याचाही दावा स्थानिकांनी केला.
या अपघातात आकाशला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर जादवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलं. आकाशची वैद्यकीय चाचणी करुन तो नशेत होता की नाही हे पाहिलं जाईल असं पोलिसांनी सांगितलं.
रुपा गांगुलींचं ट्विट
दरम्यान, या अपघातानंतर खासदार रुपा गांगुली यांनी मोदींना टॅग करुन ट्विट केलं. “माझ्या मुलाचा माझ्या घराजवळच अपघात झाला आहे. मी पोलिसांना फोन करुन कायद्यानुसार काळजी घेण्यास सांगितलं. कोणताही पक्षपातीपणा किंवा कोणतंही राजकारण करु नये” असं रुपा गांगुली म्हणाल्या.
याशिवाय माझं माझ्या मुलावर प्रेम आहे. मी त्याची काळजी घेईन, पण कायद्यानुसार सर्व प्रक्रिया व्हावी. ना मी चुकीचं करते, ना मी चुकीचं सहन करते, मी बिकाऊ नाही” असं म्हणत रुपा गांगुली यांनी मोदींना टॅग केलं आहे
click and follow Indiaherald WhatsApp channel