पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्यामधील कोथरुड मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. कोथरुडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे यांच्यामध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या मतदारसंघात मनसे विरुद्ध चंद्रकांतदादा असा शाब्दिक बाचाबाचीचा सामना रंगताना दिसत आहे. त्यामध्येच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यासाठी मनसेने ‘शांताबाई’ या गाण्याच्या चालीवर ‘चंपा दाजी’ हे गाणे तयार केले आहे. हे गाणे मनसे अधिकृत वृत्तांत या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आले आहे.
एका पत्रकारपरिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी चंपा असा उल्लेख केला. मनसे अध्यक्ष राज यांनाही त्यानंतर दोन ते तीन सभांमध्ये चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उल्लेख केला. मला माझी आई देखील लाडाने ‘चंद्या’ म्हणते, तर प्रेमापोटी हे सर्व विरोधक ‘चंपा’ म्हणतात, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या टीकेचा समाचार घेतला.
तसेच मला अजित पवार यांनी चंपा म्हटल्यानंतर राज यांनी मला काहीतरी वेगळे नाव ठेवायला हवे होते, असे मत नोंदवले. त्यांच्या भाषेत आम्ही देखील उत्तर देऊ शकतो. पण आमची संस्कृती तशी नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. असे असले तरी मनसेने आता थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर गाणे तयार केले आहे.
चंद्रकांत पाटील हे मूळचे कोथरुडचे नसून ते पुरातून वाहून आल्याची टीका या गाण्यामधून मनसेने केली आहे. तसेच सत्तेच्या लालसेतून ते सांगली कोल्हापूर विसरुन थेट कोथरुडमध्ये आले आहेत. स्थानिकांची दांडी भाजपने फुकटची आश्वासने देणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यामुळे उडवली असल्याची टीका मनसेने या गाण्यामधून केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळेच ही लढत रंगतदार होणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel