कोपरगाव  – गेल्या पाच वर्षांपासून आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा करून विविध विकास कामे मार्गी लावली आहे. परंतु त्यांच्या या विकास कामांना विरोध करणाऱ्यांना घरी बसवा अन्‌ कोल्हेंना पुन्हा विकास कामे करण्याची संधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.कोपरगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ तहसील मैदानावर आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

अध्यक्षस्थानी माजीमंत्री शंकरराव कोल्हे होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, साई संस्थानचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे उपस्थिती होती.मुख्यमंत्री म्हणाले, शंकरराव कोल्हे व जनतेच्या आर्शिवादाने गेल्या वेळी 30 हजारांच्या मताधिक्‍याने स्नेहलता कोल्हे निवडून आल्या. आता त्यांच्या पाठीमागे त्यांचे मामा राधाकृष्ण विखे उभे असल्याने यावेळी 50 हजारांच्या मताधिक्‍याने निवडून येतील.

आमदार कोल्हे व विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निळवंडेचा प्रश्‍न मार्गी लागत आहे. निळवंडेच्या कालव्यासाठी मोठा निधी दिला. ते काम लवकरच पूर्ण होणार आहे. निळवंडेच्या पाण्यावरून काहींनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली. मात्र लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या एका थेंबालाही धक्का न लावता पिण्यासाठी आरक्षित ठेवून कोपरगावसाठी निळवंडेतुन पाणी मिळणार आहे.

गेल्या अनेक वर्षापासुन पुणतांबा गावची पाणीपुरवठा योजना रखडली होती. ती योजना कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण करून दाखवली. समृद्धी महामार्गावरील स्मार्ट सिटीमुळे स्थानिक नागरिकांना 80 टक्के रोजगार मिळणार आहे. परंतु या तालुक्‍यातील काहींनी स्वार्थासाठी विरोध केला. मतदारांनी त्यांची जागा त्यांना दाखवावी, असेही ते म्हणाले.

विखे पाटील म्हणाले, स्नेहलता कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षापासून विकासाची एक नवी भूमिका घेवून मतदारसंघात तळमळीने काम करीत आहेत. मी त्यांचा मामा आहे, त्यामुळे भविष्यासह या निवडणुकीत मामा म्हणून भाचीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम करणार आहे, असे म्हणत कोल्हेंच्या कामाचे कौतुक करीत विखे यांनी त्यांचे मेव्हणे राजेश परजाणे यांचे नाव न घेता कोल्हे यांनाच आपला पाठिंबा असल्याचा दर्शविला आहे.

आ. कोल्हे यांनी पाच वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांना उजाळा देत भविष्यात मतदारसंघातील उर्वरित कामे पूर्ण करून सिंचनयुक्त व टॅंकरमुक्त मतदारसंघ करून, बेरोजगारांना रोजगार निर्माण करणार असून उद्योग, व्यापार, महिला सक्षमीकरणासह विविध विकासांना चालना देण्याची ग्वाही देत विकास कामाला अडथळा आणणाऱ्यांचा समाचार घेतला.

मतदारसंघातील हजारो नागरिकांनी या सभेत सहभाग नोंदविल्याने सभा मंडपामध्ये बसण्यासाठी नागरिकांना जागा अपुरी पडली होती. यावेळी प्रांतिक सदस्य रवींद्र बोरावके, संभाजी दहातोंडे, विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, मनाली कोल्हे, सुुमित कोल्हे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, शहरप्रमुख सनी वाघ, असलम शेख, आरपीआयचे दिपक गायकवाड, जितेंद्र रणशुर, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलन दिलीप दारूनकर यांनी केले.



మరింత సమాచారం తెలుసుకోండి: