नवी दिल्ली: सध्या सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या मुकणार आहे. दुखापतीमधून बाहेर आलेला हार्दिक अद्याप फिट नसल्यामुळे तो आगामी एकदिवसीय पाठोपाठ कसोटी मालिका खेळू शकणार नसल्याची माहिती शनिवारी बीसीसीआयने दिली.
हार्दिकच्या पाठीला मागील वर्षीच्या सप्टेंबरमध्ये यूएईत झालेल्या आशिया कप स्पर्धेत खेळताना एका सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. तो त्यातून बरा झाला आणि २०१९ च्या विश्वचषकात खेळलाही. पण, आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेदरम्यान त्याच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले. तो तेव्हापासून संघाबाहेर आहे.
भारतीय अ संघात दुखापतीतून बाहेर आल्यानंतर हार्दिकची निवड करण्यात आली होती. पण हार्दिक फिट नसल्यामुळे संघाबाहेर त्याला बसावे लागले. न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० आणि एकदिवसीय संघासाठी देखील त्याचा विचार केला गेला नव्हता. तो आता कसोटी मालिकेला देखील मुकणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात या महिन्याच्या अखेरीस दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हार्दिक पांड्या खेळणार नसून लंडनला तो जाणार आहे. त्याच्या सोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे फिजिओ आशीष कौशिक देखील लंडनला जाणार आहेत. तेथे तो डॉक्टर जेम्स आलीबोन यांची भेट घेऊन दुखापतीसंदर्भात पुढील तपासणी करणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel