भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिथे सोडला, तेथूनच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याला सुरुवात केली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक बाबीचा योग्य अभ्यास करून त्यानुसार रणनीती आखून प्रत्यक्षात मैदानावर त्याची अंमलबजावणी कशी करायची, हे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयातून सिद्ध केले.
फलंदाजांना पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या विराट कोहलीच्या निर्णयावरूनच भारताची रणनीती तयार आहे, हे दिसून येते. आपल्या सलामीवीरांनी पहिली पाच ते सहा षटके एकही चौकार न लगावता सावधरीत्या खेळून काढली. आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावणाऱ्या रोहितने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक साकारल्यामुळे संघातील सर्वच फलंदाज आश्वस्त झाले असतील; परंतु भारतासाठी सर्वाधिक सुखदायक गोष्ट म्हणजे शिखर धवनला सूर गवसणे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ‘आयसीसी’च्या प्रतिष्ठित स्पर्धामध्ये धवनने सातत्याने धावा काढल्या आहेत; परंतु ‘आयपीएल’पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याच्या धावा आटल्या होत्या. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ प्रतिस्पर्धीविरुद्ध त्याने झोकात पुनरागमन करून शतक ठोकले.
डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांपुढे धवन नेहमी चाचपडतो, असे सामन्यापूर्वी दाखवण्यात येत होते. आठपैकी सहा वेळा त्याला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी बाद केले आहे. मात्र रविवारी धवनने त्यावर तोडगा काढला. ज्याप्रमाणे एकदा सचिन तेंडुलकर श्रीलंकेच्या दौऱ्यापूर्वी लसिथ मलिंगाच्या यॉर्कर चेंडूंना खेळण्यासाठी विशेष सराव करायचा त्याचप्रमाणे शिखरने या सामन्याच्या तयारीसाठी सराव क्षेत्रात डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्यांचा (थ्रो-डाऊन) सामना केला. त्याच्या तंत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना शिखरने या शतकाद्वारे चोख उत्तर दिले. शेवटपर्यंत खेळण्याची इच्छा त्याच्या फलंदाजीतून दिसून येत होती.
सलामीवीरांनी आपले कार्य चोखपणे बजावल्यानंतर मधल्या फळीचे अर्धे काम फत्ते झाले होते. कोहलीने अगदी सहजरीत्या अर्धशतक गाठले. मात्र चौथ्या क्रमांकावर हार्दिक पंडय़ाला बढती देत भारताने त्यांच्याकडे प्रत्येक परिस्थितीनुसार फलंदाज आहेत (हॉर्सेस फॉर कोर्सेस) हे दर्शवले. पंडय़ा ज्या कलात्मकतेने चेंडूला सीमारेषेपार पोहोचवतो, ते पाहण्याजोगे असते. महेंद्रसिंह धोनीनेसुद्धा नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. त्यामुळे भारताने साडेतीनशे धावा सहज गाठल्या.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी जेव्हा सुरू झाली, त्या वेळी आपल्या गोलंदाजांनाही बळी मिळवणे सोपे नव्हते. त्यांनीही सावध सुरुवात करून लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. डेव्हिड वॉर्नरने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अक्षरश: सर्व गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली होती. त्यामुळे त्याचा बळी मिळवणे अत्यंत गरजेचे होते. वॉर्नर नेहमीच्या आक्रमक स्वरूपात फलंदाजी करत नसला तरी त्याने आरोन फिंचच्या साथीने धावफलक हलता ठेवला.
भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा ही जोडी फोडण्यात अपयशी ठरल्यावर हार्दिक पंडय़ालासुद्धा यश लाभले नाही. मात्र केदार जाधवने एक प्रकारे आपल्यासाठी विजयाचे दार उघडताना फिंचला धावबाद केले आणि सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला. कुलदीप यादवला फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र चतुर यजुर्वेद्र चहलने पुन्हा एकदा कोहलीचा विश्वास सार्थ ठरवताना धोकादायक वॉर्नरला बाद केले. उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनीदेखील अर्धशतकी भागीदारी रचली. मात्र भुवनेश्वरचे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. एकाच षटकात स्मिथ व मार्कस स्टॉइनिसला बाद करून त्याने ऑस्ट्रेलियाच्या आशा संपुष्टात आणल्या. चहलने धोकादायक वाटणाऱ्या मॅक्सवेलला माघारी पाठवले.
मुख्य म्हणजे धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नसल्यामुळे रवींद्र जडेजासारखा चपळ क्षेत्ररक्षक आपण उतरवला आणि त्याने मॅक्सवेलचा झेल घेत ते सिद्ध केले. अॅलेक्स कॅरी एका बाजूने खिंड लढवत होता, मात्र भुवनेश्वर-बुमराच्या जोडीपुढे अखेरच्या षटकांत किमान १२-१४ धावांच्या सरासरीने धावा करणे मुळीच सोपे नाही. त्यामुळे कांगारूंना ३६ धावांनी पराभव पत्करावा लागला. कुलदीपला एकही बळी मिळाला नसला तरी इतर खेळाडूंनी भारताला जगज्जेतेपदाचा दावेदार मानले जात आहे, याच आवेशात खेळ केला. आता आपला पुढील सामना न्यूझीलंडशी असल्याने आपण मोहम्मद शमीचा पर्याय वापरून बुमरावरील दडपण कमी करू शकतो, असे मला वाटते. मात्र त्यासाठी भुवनेश्वरला संघातील स्थान गमवावे लागेल.
लोकसत्ता
click and follow Indiaherald WhatsApp channel