बई - भाजपची महाजनादेश, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य आणि शिवसेनेची जन आशीर्वाद यात्रा राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्या आहेत. सांगली आणि कोल्हापुरात महापुराने थैमान घातले. हजारो लोक पुरात अडकले. या लोकांना वेळीच मदत मिळाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या टीकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेतेही सुटले नाहीत. तर सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका पार पाडणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना सांगली किंवा कोल्हापूरला भेट देण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळाला नाही.

मुख्यमंत्री फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगली आणि कोल्हापूरमधील मुहापुराची हवाई पाहणी केली. तर विविध संघटना, संस्था आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून सांगलीत मदत कार्य सुरू आहे. परंतु, याच कालावधीत गिरीश महाजन यांचा मदत कार्याला जातानाचा सेल्फी व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात विविध यात्रा काढण्यात आल्या. परंतु, सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरस्थितीमुळे या यात्रांवर सातत्याने टीका झाली. त्यामुळे पक्षांना या यात्रा रद्द कराव्या लागल्या. अनेक नेते पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीला धावले. परंतु, ठाकरे पिता-पुत्र अद्याप मातोश्री सोडून पुरात अडकलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्याकडे फिरकले नाहीत. पुरस्थितीची पाहणी करण्यास उद्धव ठाकरे जाणार असल्याचे सांगण्यात येते, परंतु, तारिख निश्चित झालेली नाही.

वास्तविक पाहता, निवडणूक विजयानंतर उद्धव ठाकरे आपल्या सर्व विजयी उमेदवारांना घेऊन कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला न चुकता जातात. परंतु, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांनी भेट न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित करण्यात आली असली उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पुरस्थितीची पाहणी करण्याऐवजी मातोश्रीवरच थांबणे पसंत केले.

लोकमत

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: